बिहारमधील राजकीय भूकंपाचे पिंपरी-चिंचवडला हादरे; शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपच्या वाटेवर - Pramod Rohidas Pardeshi

शनिवार, २९ जुलै, २०१७

बिहारमधील राजकीय भूकंपाचे पिंपरी-चिंचवडला हादरे; शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपच्या वाटेवर





पिंपरी – बिहारमध्ये भाजपने घडवून आणलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे पिंपरी-चिंचवडमध्येही जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत राहून राजकीय आत्महत्या करण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेले बरे, असा विचार स्थानिक नेते करू लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे काही स्थानिक नेते भाजपमध्ये जाण्याची चाचपणी करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीला अजून दीड वर्ष बाकी आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षांतराच्या राजकीय घडामोडींना वेग येणार असून, कोणकोणते बडे मासे भाजपच्या गळाला लागणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशात मोदी लाट निर्माण झाली. मात्र बिहारमध्ये नितीश कुमार यांनी मोदी लाटेला ब्रेक लावला होता. लालू प्रसाद यादव आणि काँग्रेससोबत आघाडी करून नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपला सत्ता मिळू दिली नाही. मात्र अवघ्या २० महिन्यांत आघाडीतून बाहेर पडून नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपसोबत सत्ता स्थापन केली. बिहारमध्ये घडलेल्या या वेगवान राजकीय घडामोडींमुळे देशाच्या राजकारणात भूकंप झाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काय असणार, हे दीड वर्ष आधीच स्पष्ट झाले आहे. या भूकंपामुळे भाजपने अपवाद वगळता संपूर्ण देशाच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
बिहारमधील या राजकीय भूंकपाचे पिंपरी-चिंचवडलाही हादरे बसण्यास सुरूवात झाली आहे. महापालिका निवडणुकीत राजकारणातील बलवान असणाऱ्या अजितदादा पवार यांना धूळ चारून भाजपने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविला. आता लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात कमळ फुलविण्यासाठी पक्ष जय्यत तयारीला लागला आहे. शहराचे राजकारण भाजपच्या बाजूने झुकणारे असल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील स्थानिक बड्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. पक्षातच राहून राजकीय आत्महत्या करायची की भाजपला जवळ करायचे, याचा विचार या नेत्यांनी सुरू केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा